उन्हाळ्यातील फळ - कलिंगड
उन्हाळा आला की रोजचे तिखट, मसालेदार अन्न नको वाटते. गरम चहा, कॉफी सारखी पेय नको वाटतात. सतत थंड पेय प्यावीशी वाटली तरी त्याने घसा धरतो. मग अशावेळी काय खावे -प्यावे सुचत नाही. मात्र कमी खाणे पिणे गेल्यास त्याचा परिणाम या दिवसात तब्येतीवर लगेच होतो.
पूर्वी उन्हाळ्यामध्ये आंबा सुरु झाला की बाकी फळे फारशी दिसत नसत. हल्ली मात्र बरीच फळे बाजारात दिसतात.कलिंगड,खरबूज,द्राक्षे,अंजीर हि फळे सध्या बाजारामध्ये भरपूर आहेत. सफरचंद ही हल्ली १२ ही महिने असते मात्र त्याला या दिवसात तितकीशी चव नसते.
कलिंगड — बाहेरून हिरवे असलेले व कापले की आतून लाल गर असलेले मोठे फळ म्हणजे कलिंगड. अतिशय रसदार असते. चवीला गोड असते. कापले कि आतमध्ये काळ्या छोट्या बिया असतात. याचा रस ही काढता येतो. लाल रंगाचा जूस दिसायला छान दिसतो. उन्हाळ्यामध्ये तहान भागवणारे हे फळ आहे .खाल्ले की तृप्त वाटते. तहान कमी होते.त्यामुळे पित्तशामक ठरते. जास्त प्रमाणात खाल्ल्यास, मळमळ होते. क्वचित जुलाब ही होऊ शकतात. नेहेमी ताजे फळ खावे. कापून ठेवलेल्या फोडी खाऊ नयेत.
कलिंगड खाण्याचे फायदे
आहारातील पोषणा नुसार कलिंगडा मध्ये बरीच पोषण मुल्ये आहेत. आम्लपित्त कमी होण्यास याने मदत होते. पचन सुधारते. तहान भागते. शरीरातील पाणी उन्हाळ्यामुळे कमी झालेले असता चक्कर येणे, डोके दुखणे असे त्रास होतात. अशावेळी, कलिंगडाचा रस १-१ चमचा देत राहावे. बरे वाटते. त्वचेवर पण याचा चांगला उपयोग होतो. याचा रस काढून चेहेऱ्यास लावावा. व ५-७ मिनिटांनी चेहेरा धुवावा. फ्रेश वाटते. याच्या बिया काढून घेऊन स्वच्छ धुवाव्यात. ओव्हन मध्ये भाजाव्यात. त्याला थोडे मीठ लावून खारवावे. खाऊ म्हणून खाता येतात. यामध्येही अनेक पोषण मुल्ये आहेत.
थोडक्यात, कलिंगड हे फळ उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी एक उत्कृष्ट, पित्तशमन करणारे, तहान भागवणारे व पोषक असे फळ आहे