गाजर — हल्ली वर्षभर गाजर मिळते. एरवी मिळणारी गाजरे केशरी रंगाची असतात. तीही चांगली, मात्र त्याला स्वाद नसल्याने फारशी वापरली जात नाहीत. थंडीमध्ये लाल-गुलाबी गाजरे येतात. ती खायला मधुर चवीची असतात. रसाळ असतात. त्यामुळे ती अनेक प्रकारे वापरता येतात.आपल्या आहारामधेही गाजर नियमित पणे  खाणे  आवश्यक आहे. गाजर थोडेसे पित्तकर आहे.मात्र थोड्या प्रमाणात कोवळे गाजर घेण्यास काहीच हरकत नाही.

गाजराचे परोठे — १ वाटी गाजराचा कीस. त्यामध्ये थोडे तीळ,ओवा,हळद, तिखट,मीठ, घालावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी. हे सर्व एकत्र मिसळून घ्यावे. त्याला थोडे पाणी सुटते. त्यामध्येच मावेल इतकी कणिक घालावी. चमचाभर तांदूळ पिठी घालावी. २ चमचे तेल घालून पीठ चांगले मळून घ्यावे. त्याचे छोटे परोठे लाटून भाजावेत. त्यावर पांढरे लोणी पसरून लावावे. खायला अतिशय चविष्ट लागतात व पोटभर होतात.

गाजराची कोशिंबीर — १ गाजर किसून घ्यावे. ते थोडेसे वाफवून घ्यावे. त्यामध्ये १ कांदा बारीक चिरून घालावा. १ चमचा दाण्याचे कूट किंवा ओला नारळ घालावा. कोथिंबीर चिरून घालावी. मीठ व १ चिमुट साखर घालून वरून लिंबू पिळावे. हि कोशिंबीर खूप रंगीबेरंगी दिसते. लहान मुलेही आवडीने खातात.

गाजर हलवा — हा सगळ्यात प्रिय असा पदार्थ थंडीत घरोघरी केला जातो. गाजर किसून घ्यावे. २ वाट्या गाजर कीस घ्यावा. थोडे पाणी व दुध भांड्याच्या तळाशी घालून त्यावर कीस घालून वाफवून घ्यावा. त्यामध्ये पाउण वाटी साखर घालावी. चागली हलवून मिक्स करावी व ते मिश्रण जरा कोरडे होईपर्यंत हलवत राहावे. ५० ग्राम खवा वेगळ्या कढई मध्ये मंद आचेवर परतून घ्यावा. तो खवा कीसामध्ये घालावा.परत चांगले परतून घ्यावे. सर्व मिश्रण एकजीव झाले की वेलची पूड घालावी. हलवावे. वरून बदाम काप घालावेत.

हलवा मधुर, बलदायक व पौष्टिक आहे.पचावयास थोडा जड असल्याने एका वेळी थोडा खावा.