हल्ली आपल्या आहारामध्ये फ्लॉवर, टोमाटो,बटाटा, कांदा या भाज्या खाण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे.त्या मानाने दोडकी, तोंडली, दुधी भोपळा, लाल भोपळा, कोहळा, वाल-पापडी,कारली, घोसावळी (गिलकी),फरजबी, अशा भाज्या कमी खाल्ल्या जातात. यांना वेली–भाज्या असे म्हणतात. कारण या भाज्यांचे वेल असतात. त्या जमिनीत कंद या स्वरूपात न उगवता वेलावर येतात. पचनाच्या दृष्टीने वेली भाज्या पचायला सोप्या व हलक्या असतात. त्यामध्ये जीवनसत्वेही भरपूर असतात. मात्र चवीला त्या चटकदार नसल्याने कमी खाल्ल्या जातात.या भाज्या विविध स्वरूपात वापरून अनेक चवदार पदार्थ बनवता येतात. त्यातील काही रेसिपीज —-
दुधी भोपळ्याचे मुटके — दुधी भोपळा, नुसती भाजी किंवा रायते किंवा गोड हलवा या स्वरुपात जास्त वापरला जातो. मुटके हा एक वेगळा प्रकार —
दुधी भोपळा किसून घ्यावा (कोवळा असेल तर साले न काढता किसावा).त्याला थोडे पाणी सुटते. त्यामध्ये मावेल इतके मुगाच्या डाळीचे पीठ घालावे. ओवा, हळद, थोडे तीळ, लाल तिखट, ४ पाकळ्या लसूण ठेचून, बारीक चिरलेली कोथिंबीर इ . घालावे. चवीला मीठ घालावे. २ चमचे तेल गरम करून घालावे. व हे पीठ मळून घ्यावे.वरून वेगळे पाणी मळण्यासाठी वापरू नये. या घट्टसर पीठाचे हाताने मुटके वळावेत. (हाताच्या मुठीसारखे गोळे). भांड्याला तळाशी थोडे तेल लावून वर हे मुटके ठेवून कुकरमध्ये शिट्टी न लावता १५ मिनिटे वाफवून घ्यावेत. वाफ गेल्यावर कुकर मधून बाहेर काढावेत. थोडे मोकळे करून घ्यावेत त्यावर तेल, मोहोरी, हिंग, लाल मिरची व कढीपत्ता अशी खमंग फोडणी द्यावी व खावेत. चटपटीत लागतात. त्यामुळे मुलेही आवडीने खातात. या पदार्थामध्ये दुधी भोपळा व मुग दाल हे दोन्ही पौष्टिक पदार्थ भरपूर खाल्ले जातात. मुलांना डब्यामध्येही देता येतात.
त्याबरोबर चटणी— १ कांदा पातळ उभा चिरून घ्यावा. १ मुठ भाजलेले शेंगदाणे, लाल तिखट,मीठ,थोडे चिंचेचे कोळून पाणी व साखर किंवा गुळ घालून मिक्सर मधून पातळसर चटणी करावी. ही चटणी मुटक्यानबरोबर खायला छान लागते.