घरून काम करत असल्यास आहार कसा घ्यावा

Home/आहार, पोषण/घरून काम करत असल्यास आहार कसा घ्यावा

गेल्या एक ते दीड वर्षामध्ये आपले रोजचे रुटीन खूप बदलले आहे. कोव्हीड-19 जसा देशभरात पसरत गेला तसे रोज ऑफिसला जाणे व दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येणे या मुख्य रुटीन मधेच बदल झाला. बहुतेक ऑफिसेस नी घरूनच काम करावे असे  धोरण ठरवले आहे. त्यामुळे वेळेचे निर्बंध कमी झाले आहेत मात्र त्याच वेळी काम मात्र वाढले आहे.

वर्क फ्रॉम होम (घरून ऑफिस काम करणे)

सगळच ऑनलाइन असल्यामुळे कोणत्याही वेळी मीटिंग घेणे अगदीच शक्य असते. लॅपटॉप उघडला की मीटिंग चालू! रोजचे उठून आवरणे नाही, ठराविक वेळेला बाहेर पडणे नाही,रोजचा प्रवास नाही त्यामुळे असा वेळ बराच वाचतो आहे.पण घरीच आहोत त्यामुळे रात्री उशिरा पर्यन्त काम करणे वाढले आहे.

मुख्य म्हणजे घरातील स्वतःच्या दिनक्रमा मध्ये बरीच उलथापालथ झाली आहे. रोजच्या खाण्या पिण्याच्या वेळा, व्यायाम अशा अनेक गोष्टींच्या वेळा बदलल्या आहेत. तासन तास लॅपटॉप समोर बसणे चालू आहे. घरीच जेवतो आहोत, सध्या हॉटेल मध्ये जाता येत नाही म्हणून घरी तळलेले पदार्थ ,चमचमीत जेवण हे वाढलेले आहे. यातून कुठेतरी अंनारोग्याचा पाया खोदला जातो आहे.

दुष्परिणाम

शाळा बंद,कॉलेज बंद त्यामुळे मुलेही घरीच आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे त्यांचेही बसून राहणे वाढले आहे. ग्राऊंड वर जाणे, मोकळ्या हवेत खेळणे यासाठी शाळा हे एक हक्काचे ठिकाण असते पण शाळाच बंद असल्याने या सगळ्या मैदानी खेळांना पण लॉक लागले आहे.

एका जागी बसून सतत मोबाइल बघणे किंवा लॅपटॉप बघणे हे शालेय विद्यार्थ्यांचे आयुष्य बनले आहे. त्याचा निश्चित परिणाम त्यांच्या आरोग्यावर होणार आहे॰ अजून पुढील काही महीने आपली जीवनशैली अशीच राहील ही पण शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी या परिस्थितीचा आरोग्याच्या दृष्टीने फायदा कसा करून घेता येईल?

सकाळचा पोषण आहार

घरी असताना बरेच वेळा सकाळचे जेवण उशिरा घेतले जाते. सकाळपासून काम करणे व नंतर जेवणे यामध्ये जेवायला उशीर होतो. अनेक जणांना सकाळी ब्रेकफास्ट करण्याचीही सवय नसते. सकाळभर काही न खाता दुपारी 1-2 वाजता जेवण होते. मग जेवताना २ घास जास्त जेवले जाते व त्याचा त्रास होतो.

यासाठी सकाळी पूर्ण ब्रेकफास्ट नको असला तरी १ कप दुध घ्यावे. किंवा राजगिरा वडी व दुध, साळीच्या लाह्या व दुध असे हलके पण पौष्टिक अन्न घ्यावे. ज्यांना ब्रेकफास्ट ची सवय असेल त्यांनीही पूर्वी प्रमाणे भरपूर ब्रेकफास्ट न घेता थोडा घ्यावा. जसे एक साधा पराठा, एक धिरडे, एक छोटे थालीपीठ. इत्यादि.

ब्रेकफास्ट बरोबर दूध पिऊ नये. दूध सकाळी घ्यावे. तसेच पोहे, उपमा, वडा-सांबार,बटाटे वडा यासारखे पदार्थ ब्रेकफास्ट ला  वारंवार घेणे टाळावे. ब्रेकफास्ट हे आपले दिवसातील पहिले अन्न असते त्यामुळे ते सौम्य असावे.   

दुपारचा पोषण आहार

दुपारच्या जेवणामध्ये  काटछाट करू नये. ते पूर्ण जेवण घेणे आवश्यक असतेच. उदा : २ फुलके, १ वाटी उसळ किंवा २ वाट्या आमटी, १ वाटी कोशिंबीर व अर्धी वाटी भाजी  घ्यावी. जोडीला ताजे ताक घ्यावे. अनेक घरांमध्ये जेवताना फक्त १ रस्सा भाजी व पोळ्या बनवल्या जातात. त्यातही रस्सा जास्त व त्यामधील भाजी कमी असते. 

बहुतेक जेवण या रस्स्याबरोबर होते, मात्र यामध्ये भाजी कमी जाते अशा खाण्यातून आवश्यक पोषण मिळत नाही. यासाठी वरीलप्रमाणे पूर्ण जेवण घेणेच आवश्यक असते. मात्र एका वेळी आहार जास्त न घेता तो विभागून घेता येतो. जसे सकाळी 10 वाजता पोळी-भाजी व कोशिंबीर घ्यावी. दुपारी १ वाजता फक्त थोडा भात व त्यावर जास्त प्रमाणात डाळ घ्यावी.  

शिळे जेवण किंवा शिळा आहार

दुसरा महत्वाचा भाग शिळे अन्न खाण्याचा. बहुतेक घरांमध्ये रात्री उरलेले अन्न दुसरया दिवशी खाण्याची पद्धत असते. पोळ्या, भाकरी, भात उरला की त्याला चमचमीत फोडणी देऊन तेच पोटभर खाल्ले जाते. त्याबरोबर दही खाल्ले जाते. घरातील विशेषतः स्त्रीयांना ही सवय जास्त असते.

इतरांसाठी ताजे बनवून आपण  शिळे खाणे. अशा आहारातून पोषण काही मिळत नाही. कालांतराने बर्याच जणींना अंगातील रक्त कमी होणे, अशक्तपणा वाटणे,बारीक होणे अशी लक्षणे दिसू लागतात कारण पोषण योग्य होत नाही।

त्यामुळे शिळे अन्न खाऊ नये. बनवतानाच उरेल इतेक बनवू नये. उरल्यास ते अन्न थोडे थोडे सर्वाना वाटून द्यावे. फोडणीची पोळी-दही असे खाण्यापेक्षा ती पोळी  ताजे वरण बनवून त्याबरोबर खावी, किंवा ताज्या उसळी बरोबर खावी. 

तसेच, लोणचे, हिरव्या मिरचीचा ठेचा, खर्डा अशा गोष्टी घरी असताना जास्त घेतल्या जातात व त्यामुळे आमटी-भाजी थोडीच घेतली जाते. मुळात असे पदार्थ म्हणजे केवळ जिभेचे चोचले असून त्याचा शरीराला फारसा उपयोग नसतो. त्यामुळे ते थोडे घ्यावेत.  रोज घेऊ नयेत.

सारांश

थोडक्यात, घरी असताना परिपूर्ण आहार घेणे तितकेच महत्वाचे आहे मात्र तो विभागून घेणे महत्वाचे आहे. पोट भरणे आणि शरीराला पोषण मिळणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही अयोग्य पदार्थ पोटभर खाल्ले म्हणून तुमचे पोषण पूर्ण होईलच असे नाही. त्यामुळे जेवताना आपल्या पोषणाकडे लक्ष जास्त द्यावे.

ऑनलाइन काम करतो आहे म्हणून मीटिंग चालू असताना कसेतरी भरभर जेवणे, नूडल्स, पोहे, फक्त भात असे पदार्थ जेवताना न घेता कामातून 20 मिनिटे ब्रेक घ्यावा व पूर्ण जेवण करावे. पाणी खूप न पीता घोट घोट पीत राहावे.

या प्रकारे तुम्ही तुमचा आहार ठेवलात तर शरीराला पोषण छान मिळेल, थकवा,डोकेदुखी, अम्लपित्त यासारखे त्रास होणार नाहीत. बसून काम असल्याने वजन वाढते पण योग्य आहारा मुळे शरीराचे पोषण चांगले झाले तर उलट वजन आटोक्यात राहायला मदत होते. त्या बरोबर व्यायाम नियमित केला तर फिटनेस उत्तम राहतो.

त्यामुळे आज पासून आपल्या खाण्या कडे जरूर लक्ष द्या आणि उत्तम आरोग्य घर बसल्या मिळवा !                          

Go to Top