...

उन्हाळ्यातील आहार | उन्हाळ्यात आहार कसा असावा | उन्हाळी लागणे उपाय

Home/Health, Wellness, आहार/उन्हाळ्यातील आहार | उन्हाळ्यात आहार कसा असावा | उन्हाळी लागणे उपाय

उन्हाळ्याच्या झळा

या वर्षी उन्हाळ्याने सीझनच्या सुरुवातीलाच उग्र स्वरूप धारण केले आहे. आपण निसर्गाचा करीत असलेला अपमान आपल्याला त्याची शिक्षा आता देऊ लागला आहे असेच म्हणावयास हवे. सिमेंट चे वाढलेले जंगल, कमी झालेली झाडे, पाण्याचा गैरवापर आणि प्रदूषण या सगळ्यांमुळे पृथ्वी अधिकाधिक तापू लागली आहे. त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे उन्हाळा सुरु झाला कि उन्हाच्या गरम झळा लागतात. घाम येतो. अंगाची काहिली होते. डोळ्यांची आग होते.

दुपारच्या वेळी खूप उन असताना थकवा जाणवतो.काहीही करू नये, बसून राहावे असे वाटते. स्त्रीयांना स्वैपाक घरामध्ये या दिवसात काम करणे म्हणजे खरी शिक्षा असते. उन्हाळा म्हणजे अंगातील शक्ती खेचून घेणारा सीझन.

आयुर्वेदामध्ये काळाचे २ भाग पडले आहेत. एक, विसर्ग काल व दुसरा आदान काल. विसर्ग काळामध्ये साधारणपणे ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंतचा काल येतो. संक्रांति नंतर संक्रमण झाले की सुरु होणाऱ्या उन्हाळ्याच्या काळास आदान काल असे म्हटले जाते.

विसर्ग काळामध्ये होऊन गेलेला पाउस,तयार पिके, भाज्या फळे यामुळे निसर्ग आणि माणूस दोघेही ताजेतवाने व टवटवीत राहतात.या काळात भूक व पचनशक्ती दोन्ही उत्तम असल्याने माणसाची ताकद चांगली वाढते.

याउलट, उन्हाळ्यामध्ये उष्मा वाढतो,निसर्ग तापतो.त्याचा त्रास माणसानाही होतोच.त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटते. ताकद कमी होते. उन्हामुळे खाण्याची इच्छा कमी होते.तहान जास्त लागते. अशावेळी आपले खाणे पिणे कसे असावे ? कारण उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या या त्रासांसाठी विशिष्ट औषधे घेण्या आधी आपल्या खाण्यापिण्याचे काही नियम पाळल्यास त्रास नक्कीच कमी होतो.

उन्हाळ्यातील आहार / उन्हाळ्यात आहार कसा असावा

• उन्हाळा सुरु झाला म्हणून एकदम फ्रीजचा वापर वाढवू नये .
• थंड पाणी,फ्रुटज्यूस,थंड पाणी, थंड ताक घेऊ नये .
• दुपारच्या कडक उन्हात बाहेर जावेच लागले तर डोके व कान झाकून बाहेर पडावे.
• जवळ खडीसाखर,काळ्या मनुका, आवळा ,बत्तासा ठेवावे व ते मधून मधून खावे .
• दुपारची झोप टाळावी .
• रात्री उशिरा हॉटेल मध्ये जेवणे टाळावे .
• मांसाहार कमी करावा. स्वैपाकामध्ये ओला नारळ, कोथिंबीर,धने पावडर यांचा जास्त वापर करावा.
• दिवसातून २-३ वेळा भरपूर पाण्याने चेहेरा, हात,पाय धुवावे.
• उन्हात फिरावे लागल्यास, आवळा सरबत, कोकम सरबत,धन्याचे पाणी, नारळपाणी प्यावे.

summer health tips in marathi

उन्हाळी लागणे उपाय

उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना त्रास होतो तो उन्हाळी लागण्याचा. म्हणजेच लघवीला आग व गरम होण्याचा. अशावेळी १ चमचा धने ४ कप पाण्यात घालून चांगले उकळावेत. ३ कप पाणी शिल्लक ठेवावे. गाळून हे पाणी थोडे थोडे पीत राहावे. आग कमी होते.

अनेक जणांचा उन्हाळ्यामध्ये घुळणा फुटतो.म्हणजेच नाकातून अचानक रक्तस्त्राव होतो. अचानक रक्त आल्याने घाबरून जायला होते. मात्र अशावेळी नाकाचा शेंडा, बोटाच्या चिमटी मध्ये घट्ट धरून ठेवावा. कांदा फोडून त्याचा वास घ्यावा. गणपतीला ज्या दुर्वा वहिल्या जातात त्या दुर्वाची जुडी घेऊन, स्वच्छ धुवावी. व तुकडे करून अगदी थोडसे पाणी घालून मिक्सर मधून त्या दुर्वा वाटून घ्याव्यात.पातळ सुती कापडातून या वाटलेल्या दुर्वा पिळून त्याचा रस काढून घ्यावा. हा रस डबीत भरून ठेवावा. फ्रीज मध्ये टिकतो. नाकातून रक्त येत असल्यास २ थेंब रस नाकात घालावा. असे दिवसातून सकाळ -संध्याकाळ २ वेळा करावे.

काही जणांना डोळ्यांची आग होते. अशावेळी दुधाच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात. तळपायांच्या मध्यभागी गाईचे तूप चोळावे. यामुळे डोळे शांत होतात.
असे अनेक होणारे त्रास, सध्या उपचारांनी बरे करता येतात. भरपूर पाणी, फळांचे रस, साधा आहार हीच उन्हाळ्यामध्ये तब्येत उत्तम ठेवण्याची गुरुकिल्ली आहे !

डॉ.सरिता वैद्य (एम.डी.)

Go to Top
Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.