Mango Benefits in Marathi – आंबा खाण्याचे फायदे

Home/Health, Wellness, आहार/Mango Benefits in Marathi – आंबा खाण्याचे फायदे

आंबा खाण्याचे फायदे

फळांचा राजा आंबा

खरंतर उन्हाळ्यामध्ये फळ म्हटले की  डोळ्यासमोर येतो तो आंबा ! जर्द केशरी रंगाचा, सुगंधी घमघमाट असलेला आंबा पेट्यांमध्ये दाखल होतो आणि आंब्याचे दिवस सुरु झाले हे मग वेगळे सांगावे  लागत नाही.

आंब्याच्या अनेक जाती आहेत. सगळ्यात उत्तम समजला जातो तो हापूस आंबा. पायरी,केसर,तोतापुरी, कर्नाटकी,बदामी अशा त्या त्या  प्रांतात होणाऱ्याही अनेक जाती आहेत. आपल्याकडे आंबा हे फळ प्रामुख्याने कोकणात होते.

आंबा मधुर, गोड असला की तो खाण्यास छान लागतो. पचण्यास आंबा थोडा जड आहे. मात्र अतिशय पौष्टिक असे हे फळ आहे. बल वाढवते. वजन वाढवते.  अतिशय कृश असणाऱ्या व्यक्तींनी वजन वाढावे यासाठी आंबा जरूर खावा.

आंब्याचा रस काढून तो साजूक तूप घालून खावा. मात्र आंब्याचा रस काढताना त्यामध्ये पाणी घालू नये. रसात पाणी घातल्याने व तो रस खाण्यात आल्याने जुलाब होऊ शकतात.

हापूस आंबा किंवा तोतापुरी आंबा हा फोडी करून चांगला लागतो.आंब्याच्या फोडी तुलनेने पचावयास सहज असतात. त्यामुळे ज्यांचे पचन नाजूक आहे अशा व्यक्ती आंबा खाण्यास घाबरतात, त्यांनी आंब्याच्या फोडी खाव्यात.  

आंबा दुधामध्ये घालून आंबा मस्तानी बनवता येते. गुणधर्माच्या दृष्टीने ही पचण्यास जड आहे. आंबा अतिशय गोड असला तर त्यामध्ये दुध घातलेले चालते. अन्यथा कोणतेही फळ व दुध एकत्र करून खाऊ नये.

आंबा कधी खाणे योग्य ?असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याचे खरे उत्तर आंबा सकाळी खावा. रात्रीच्या जेवणात आंब्याचा रस घेणे टाळावे. आंबा खाल्ल्यानंतर त्याच्या पचनास ३ ते ४ तासांचा वेळ द्यावा. म्हणजे आंबा उत्तम पचतो. असा खाल्लेला आंबा वजन वाढवतो. ताकद वाढवतो.

असा हा फळांचा राजा, या ऋतूचा राजा, आंबा प्रकृतीस उत्तम असतो.

आंब्याच्या काही रेसिपीज

१) हापूस आंब्याचा मुरंबा — हापूस आंबे ४, साखर २ वाट्या. आधी हापूस आंबे पाण्यात स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. फोडी करून त्यातून आतील गर काढून घ्यावा. त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. २ वाट्या साखरेमध्ये तेवढेच पाणी घालावे. मंद आचेवर ठेवून पाक करावा.पक्का पाक झाला कि खाली उतरवून त्यामध्ये आंब्याच्या फोडी घालाव्यात की तो पुन्हा पातळ होतो. त्याला मंद आचेवर ठेवून पुन्हा थोडा वेळ आटवावे व खाली उतरवावे. पूर्ण गार झाला की वेलची पूड घालावी.( नाही घातली तरी चालते.) हा मुरंबा चविष्ट लागतो. रंगाने केशरी होतो त्यामुळे सुंदर दिसतो. लहान मुलांना कृत्रिम रंगाचे जाम ब्रेडला लावून देण्यापेक्षा हा मुरंबा लावून द्यावा. पोळीशी खायला ही चांगलाच लागतो. डब्यात देता येतो. वर्षभर टिकतो.  

२) नाचणी सत्व आणि हापूस आंबा — नाचणी चे जितके स्वच्छ पांढरे सत्व मिळेल ते घ्यावे.–५ चमचे.  त्यामध्ये आधी थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. मग त्यामध्ये ३ कप दुध घालून परत थोडे शिजवून घ्यावे. ५ चमचे साखर घालावी. पूर्ण हलवून विरघळवून घ्यावी. हे मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये ओतून गार करत ठेवावे. त्यामध्ये हापूस आंब्याच्या फोडी चौकोनी कापून घालाव्यात. काजू, बदाम काप करून घालावे. व मग हे मिश्रण सेट करायला फ्रीज मध्ये ठेवावे. २ तासांनी काढून वड्या पडून खायला द्यावे.

उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी एक उत्तम डीश आहे. चविष्ट लागते. गुणाने थंड असते. पित्तशामक आहे. संपूर्ण नैसर्गिक पदार्थांनी बनलेले असल्याने, पौष्टिक आहे.

Go to Top