हिवाळा सुरु झाला. थंडी पडू लागली. आपल्याला हल्ली हवामानामधील बरेच बदल सहन करावे लागत आहेत.पावसाळा बराच लांबला. आणि आता थंडी सुरु झाली.

ऋतू कोणताही असला तरी काम थांबत नाही. थंडी पडली आहे म्हणून दुलई ओढून झोपून जावे असे कितीही जरी वाटले तरी प्रत्यक्षात ते शक्य नसते. रोजचे ऑफिस.. प्रवास.. धावपळ ही चालूच राहते. मग या अशा बदललेल्या ऋतूमध्ये आपली जीवनशैली पण थोडी बदलावी लागते. तरच तो ऋतू एन्जॉय करता येतो.

सकाळी उठल्यावर आधी गरम पाणी प्यावे. अंघोळ करण्यापूर्वी अंगाला तेल लावावे. साबणाचा वापर शक्यतो टाळावा.किंवा आठवड्यातून २-३ वेळेस साबण लावावा..तोही हलका हात फिरवून. बाकी वेळी मसुराचे पीठ व दुध एकत्र करून ते वापरावे. किंवा तिळाचे कूट करून ते अंगाला लावावे.

अंगामध्ये सिंथेटिक कपडे घालणे टाळावे. निदान आतमध्ये सुती कपडे घालावेत. मोटरसायकल  वरून जाताना थर्मल कपडे घालावेत. त्यामुळे थंडी वाजत नाही. ऑफिसमध्ये जर ए.सी. असेल तर थर्मल कपडे आतून घातल्यावर चांगले संरक्षण मिळते.

या हवेमध्ये थंड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे. गरम, पातळ अन्न जसे सूप..आमटी..वरण..पातळ उसळ… असे पदार्थ जास्त घ्यावेत.

या हवेमध्ये भूक चांगली लागते. खाल्लेले अन्न पचते ही. म्हणूनच या ऋतूमध्ये खीर, शिरा असे पदार्थ खावेत. दुधी हलवा, गाजर हलवा घ्यावा.  हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू मुद्दाम  केले जातात. रोज एक लाडू खावा. दुध गरम करून थोडी हळद घालून प्यावे.

मांसाहार करण्यास हा ऋतू चांगला. त्यामुळे ज्यांना सवय आहे अशांनी आठवड्यातून एकदा मांसाहार करावा.  मात्र हे सर्व खाणे पिणे आपली पचनशक्ती बघूनच करावे. पचन चांगले नसल्यास हे पदार्थ खाऊन त्यापासून फायदा न होता उलट तोटाच होतो. यासाठीच  अति मसालेदार व तेलकट अन्न खाऊ नये. नॉन-व्हेज खाणे म्हणजे  चमचमीत रस्सा करून खाणे असे नाही. त्या ऐवजी भाजलेले किंवा सूप या स्वरूपात घेतले  तर ते जास्त आरोग्यकारक ठरते.

या हवेत आजारी पडायचे नसेल तर व्यायाम मस्ट. रोज सूर्य नमस्कार घालणे हा सर्वात उत्तम व्यायाम. जिम मध्ये व्यायामाची सवय असेल तर एकीकडे व्यायाम व एकीकडे ए.सी. चालू असे नसावे. शक्य असेल तेव्हा उन्हामध्ये चालावे.

वर सांगितलेले उपाय हे नवीन नाहीत. मात्र आपल्या हल्लीच्या जीवन शैलीमध्ये आपण ते विसरलो आहोत हे ही खरे. म्हणून या लेखातून थोडीशी आठवण केली इतकेच.